पिंपरी, १ मार्च २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास कार्यकारी अभियंता विनय ओहोळ आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कनिष्ठ अभियंता एम.ए.अहिरे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भोसले तसेच विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग होता, त्या चळवळीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विकास करण्यावर भर दिला. त्यामध्ये ग्रामीण विकास, कृषी विकास, उद्योग विकास या बाबींवर विशेष लक्ष दिले. त्यांचे सार्वजनिक कार्य, संघटनकौशल्य आणि एकनिष्ठता अनेकांना प्रेरणा देणारी आहे.पद्मभूषण विभूषित माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, शैक्षणिक क्रांतीचे पुरस्कर्ते, राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. सामान्य शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबविल्या. सहकारी संस्थाचे विशाल जाळे त्यांनी निर्माण केले होते.