पिंपरी :- पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले यांनी तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर यांनी आज शुक्रवारी (दि. १९) रोजी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याने घुले यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि. २३) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
भाजपकडून अर्ज भरतेवेळी महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण भालेकर, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते.
केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी आज (शुक्रवारी) तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी (दि. २३) रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवून जिंकणार कि नेहमीप्रमाणे तोंडावर आपटणार की माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.