भारतातील कॉर्पोरेट रोखे बाजारामध्ये पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक एकत्रित मंच
पुणे –सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), एनएसई, बीएसई, एनएसडीएल, सीडीएसएल यांच्या सहकार्याने ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (OBPPAI – https://obppindia.com/) रोखे गुंतवणूकदारांसाठी बाँड सेंट्रल (https://bondcentral.in/) या महत्वपुर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. गुंतवणूक क्षेत्रातील या अग्रगण्य उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताच्या कॉर्पोरेट रोखे (बाँड) बाजारामध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणणे, त्याचबरोबर रिटेल गुंतवणूकदारांचा अधिकाधिक सहभाग वाढवून परिवर्तन घडवून आणणे हा आहे.
ओबीपीपी प्लॅटफॉर्मचे कामकाज सुरु झाल्यापासून, गेल्या १ वर्षात कॉर्पोरेट रोखे आणि एसडीआयमधील मासिक व्यवहारांमध्ये तब्बल ३२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (स्रोत: बीएसई)
बाँड सेंट्रलची रचना ही प्रामुख्याने कॉर्पोरेट रोखे बाजाराच्या माहितीतील तफावत दूर करणे, त्याचबरोबर गुंतवणूकदारांना रोखे बाजाराकडे आकर्षित करणे आणि व्यापक शैक्षणिक संसाधनांसह त्यांना सक्षम करणे या प्रमुख उद्देशांनी करण्यात आलेली आहे. भारतातील कॉर्पोरेट रोखे बाजाराची खोली अधिकाधिक वाढविणे त्याचबरोबर रिटेल गुंतवणूकदारांना स्थिर गुंतवणूक पर्याय प्रदान करण्यासाठी सेबीने सुरु केलेल्या प्रयत्नांशी हा उपक्रम अतिशय सुसंगत आहे.
कॉर्पोरेट रोखे गुंतवणूकीचा अनुभव समृध्द करण्यासाठी बाँड सेंट्रल अनेक प्रमुख वैशिष्ट्ये प्रदान करतो. हा उपक्रम रोख्यांची एक व्यापक सूची प्रदान करतो. त्याचबरोबर एक्सचेंजेस आणि रोखे जारी करणाऱ्या संस्था आणि कंपन्यां यांच्यात कॉर्पोरेट रोख्यांबाबत एकसंध दृष्टिकोन ठेवतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना विविध रोख्यांची सतत माहिती शोधता येते तसेच विविध रोख्यांची तुलनाही करता येते. रिटेल गुंतवणूकदार कॉर्पोरेट रोख्यांच्या किमतींची तुलना सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक) आणि इतर निश्चित-उत्पन्न निर्देशांकांशी करू शकतात आणि त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेता येतात.
हा मंच तपशीलवार जोखीम मूल्यांकन, रोख्यांचे दस्तऐवज आणि प्रकटीकरणे आदी माहिती प्रदान करत रिटेल गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरणाऱ्या माहितीलाच प्राधान्य देतो. त्यामुळे संधींचे प्रभावीपणे मूल्यांकन करण्यास गुंतवणूकदारांना मदत होते. याव्यतिरिक्त, बाँड सेंट्रल कॉर्पोरेट रोख्यांशी संबंधित माहितीचे प्रमाणीकरण करण्याबरोबरच माहितीतीतील विषमता कमी करून पारदर्शकता वाढवतो आणि निश्चित-उत्पन्न बाजारपेठेबद्दलच्या विश्वासाची पातळीही उंचावतो.
उद्योग धुरिणींकडून बाँड सेंट्रल उपक्रमाचे स्वागत
ओबीपीपी असोसिएशनच्या अध्यक्षा आणि इंडियाबॉन्ड्सच्या सह-संस्थापक श्रीमती अदिती मित्तल म्हणाल्या:
“भारताच्या कॉर्पोरेट रोखे बाजाराला त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी, गुंतवणूकदारांना स्पष्टता, आत्मविश्वास आणि सुलभता प्रदान करणे अतिशय आवश्यक आहे आणि बाँड सेंट्रल या तिन्ही आघाड्यांवर उत्तम काम करते. गुंतवणूकदार-अनुकूल वैशिष्ट्यांसह एकत्रित मंच गुंतवणूकदारांना प्रदान करत
कॉर्पोरेट रोखे आणि एसडीआयमध्ये अन्य कोणत्याही मालमत्ता वर्गाप्रमाणे गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे, ही खात्री आम्ही त्यांना देत आहोत.”
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना ग्रीप इनव्हेस्टचे सहसंस्थापक आणि ओबीपीपीचे संचालक श्री. आशिष जिंदल म्हणाले,
” बाँड सेंट्रल हे भारतात वाढत चाललेल्या कॉर्पोरेट रोखे गुंतवणुकीच्या दिशेने टाकलेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे. डेटा, किंमत, तुलना आणि जोखीम याबाबतची माहिती एकत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही गुंतवणूकदारांना सक्षम करणारी डेटा-आधारित पारदर्शक परिसंस्था उभारत आहोत.”
वृध्दी आणि बाजार सहभागाला पाठबळ
बाँड सेंट्रल हे रोखे बाजारासाठी पायाभूत सुविधा वाढवेल. तसेच कॉर्पोरेट बाँड मार्केटमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवेल आणि संतुलित गुंतवणूक परिसंस्थेला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी रोखे गुंतवणूक या सेबीच्या दृष्टिकोनाला पाठबळ मिळेल.