पिपीसी न्यूज नेटवर्क,
पुणे :
मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे यांना राज्यस्तरीय मानाचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यातच नव्हे तर देशातही प्रथमच एखाद्या प्रादेशिक मनोरुग्णालयाला असा सन्मान मिळाल्याने हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट येथे २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आरोग्य विभागामार्फत विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला.

प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथील सन २०२५-२६ मधील कामगिरीत अंतर्गत व बाह्य रुग्णसेवा, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार, तसेच रुग्णांचे पुनर्वसन व समुपदेशन या क्षेत्रांत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “कुटुंब व समाजाकडून दुर्लक्षित होणाऱ्या मानसिक रुग्णांना सेवा देणे, त्यांची काळजी घेणे हे खरे समाजकार्य आहे. या पुरस्कारामुळे सर्व कर्मचारी व आरोग्यसेवकांचे मनोबल उंचावले आहे,”अशी भावना रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.
या सन्मानामुळे मानसिक आरोग्य सेवेकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्यास मदत होईल, तसेच इतर आरोग्य संस्थांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



















































