पिंपरी चिंचवड :- स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत झालेल्या गोंधळातून शिवसेनेच्या एका गटाने आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. यातच राजकीय बळी ठरलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आज अखेर गटनेते पदाचा राजीनामा दिला. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी याबाबत खुलासा कलाटे यांच्याकडून मागवला होता. तो समाधानकारक वाटला नाही, त्यामुळे कलाटे याच्यावर कारवाई करण्यात आली.
स्थायी सदस्य निवडीत पक्षादेशाचा भंग केल्याने गटनेतेपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश दिले होते. मात्र त्यापूर्वी त्यांना खुलासा मागवला होत. त्यानंतर शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी कलाटे यांना दूरध्वनीवरून ईमेल पाठवून राजीनामा देण्याच्या सूचना केल्या.
काय आहे हे प्रकरण ……
महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी १८ तारखेला आठ सदस्यांची निवड झाली.त्यात शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, कलाटे यांनी पक्षादेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव दिल्याने त्यांच्या गटनेतेपदावर संक्रांत आली. गटनेतेपदी काम करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे. पक्षादेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात. त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर व विभागीय आयुक्तांकडे द्यावा, असा आदेश राऊत यांनी कलाटे यांना दिला आहे. त्यावर आज कलाटे यांच्या राजीनाम्यानंतर शिक्कामोर्तब झाला आहे.