पुणे : भारतात पेन्शन अंतर्गत व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या निधीरुपी मालमत्तेमध्ये (एयूएम) लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज डीएसपी पेन्शन फंड मॅनेजर्सने आपल्या अहवालात वर्तवला आहे. येत्या २०३० पर्यंत एकूण एयूएम ११८ ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज असून त्यात राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (एनपीएस) चा वाटा एकूण रकमेत अंदाजे २५ टक्के राहील, अशी अपेक्षा आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे दिसणाऱ्या परिणामांच्या आधारावर ही वाढ गृहीत धरण्यात आलेली आहे.
२०५० पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या २.५ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. तसेच निवृत्तीनंतरच्या आयुर्मानातही वाढ होऊन ती सरासरी २० वर्षांची असेल. सध्या भारतातील पेन्शन बाजारपेठेचा फारसा विस्तारच झालेला नाही. या बाजारपेठेचा सध्याचा आकार देशाच्या जीडीपीच्या अवघा ३ टक्के आहे. निवृत्तीसाठीच्या बचतीतील तफावत दरवर्षी १० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती २०५० पर्यंत अंदाजे ९६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या दशकात भारतीयांचे रोख आणि बँक ठेवींवरील अवलंबित्व ६२ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने भारतातील रिटेल गुंतवणूकदार पारंपारिक बचत पद्धतींपासून बाजाराशी संबंधित गुंतवणुक साधनांकडे अधिकाधिक वाटचाल करताना दिसत आहेत.
गेल्या पाच वर्षांत एनपीएसच्या खासगी क्षेत्रातील एयूएममध्ये २६.८ टक्क्यांनी लक्षणीय वार्षिक वाढ होऊन ते ८४,८१४ कोटी रुपयांवरून २ लाख ७८ हजार १०२ कोटी रुपयांवर झेपावले आहे. २०२० ते २०२४ या आर्थिक वर्षात नवीन नोंदणींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामध्ये पुरुष सदस्यांमध्ये ६५ टक्के तर महिला सदस्यांमध्ये ११९ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेल्या एनपीएस वात्सल्य योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत ८६,००० हून अधिक सभासदांची भर पडली आहे.
भविष्याचा वेध घेता, पुढील पाच वर्षांत १.५ कोटींहून अधिक ग्राहकांसह एनपीएसमधील खासगी क्षेत्राचा एयूएमरुपी निधी ९ लाख १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर सुधारणा, जुन्या आणि नवीन कर प्रणालींमध्ये एनपीएसचा समावेश, एनपीएस वात्सल्यमध्ये योगदान देणाऱ्या पालकांसाठी करसवलतीत लाभ, सरकारी कर्मचाऱ्यांकडून खासगी क्षेत्रातील निधी व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार, तरुण पिढीकडून (२०-३० वयोगट) एनपीएसला वाढती पसंती आणि निधी व्यवस्थापनात तंत्रज्ञान आणि एयआयचे एकत्रीकरण हे या वाढीचे प्रमुख घटक ठरले आहेत.
डीएसपी पेन्शन फंड मॅनेजर्सचे सीईओ राहुल भगत या अहवालप्रसंगी म्हणाले, “भारतातील पेन्शनची बाजारपेठ वेगाने विकसित होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. योग्य धोरणे आणि वाढत्या जागरूकतेमुळे या बाजारपेठेत नागरिकांसाठी लक्षणीय मूल्ये उघडण्याची क्षमता आहे. आमची गुंतवणूकीची मजबूत प्रक्रिया आम्हाला या क्षेत्रात एक महत्त्वाची कंपनी बनण्यास मदत करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. येत्या ५ वर्षांत या उद्योगक्षेत्रात टॉप ५ कंपन्यांमध्ये
सामील होण्याची आम्ही अपेक्षा करतो. आम्ही व्यक्त केलेले अंदाज दीर्घकालीन सेवानिवृत्ती नियोजनाचे महत्त्व आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात एनपीएसची भूमिका अधोरेखित करतात. “





















































