*विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वातील स्व संशोधनावर भर द्यावा – सुनील देशमुख*
*पिंपरी : दिनांक ०४ एप्रिल २०२५ :* विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रम आणि कौशल्य आत्मसात करीत असतानाच व्यक्तिमत्वातील स्व संशोधनावर भर द्यायला हवा असे आवाहन अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सचे प्रमुख सुनील देशमुख यांनी केले. ते शुक्रवारी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) यांच्यावतीने आयोजित व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानातील नवोपक्रम या मध्यवर्ती संकल्पनेवरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी
सातत्याने नवनवीन बाबी शिकण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नावीन्यतेचा ध्यास घेताना केवळ नवनिर्मितीवर भर न देता प्रक्रिया व यंत्रणा पद्धतीत नावीन्यतेचा विचार युवकांनी करायला हवा असे ते म्हणाले. तसेच करिअरच्या केवळ एकाच पर्यायाचा विचार न करता मी आणखी काय करू शकतो याचा विचार करून करिअरच्या अन्य पर्यायांचा विचार आणि त्यादृष्टीने प्रयत्न देखील करायला हवे असे देशमुख यांनी सांगितले. प्रत्येक समस्या स्वतः सोडवण्याचा अट्टाहास न करता विविध क्षेत्रातील जनसंपर्क वाढवून त्या त्या क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करायला हवा असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासमवेत दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक गोपाळ दळवी,इंड्यूरन्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार, आयबीएम कंपनीचे कार्यक्रम व्यवस्थापक मनोज चौधरी, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व्यासपीठावर उपस्थित होते. दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक गोपाळ दळवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिकत शिकत एखाद्या गोष्टीत पारंगत होण्यावर भर कसा द्यावा याबाबत विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.
तर इंड्यूरन्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार यांनी त्यांच्या मनोगतात विद्यार्थ्यांनी करिअरला सुरुवात करताना मला अमुक प्रकारची आणि गलेलठ्ठ पगाराचीच नोकरी मिळायला हवी अशा अवास्तव अपेक्षा ठेवू नये, तसेच बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेच्या वातावरणामुळे औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाचीच आवश्यकता आहे ही बाब विद्यार्थ्यानी समजून घेऊन त्यानुसार स्वतः अनुकूल बदल अंगीकारावेत असे सांगितले.याप्रसंगी ‘यशोमंथन’ या शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नेपाळच्या युनिग्लोब कॉलेजच्या अर्थशास्त्र व सामाजिक शास्त्र विषयाचे प्रमुख डॉ.गंगाधर दहल यांनीही दृकश्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष व ऑनलाईनपद्धतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत एमबीए,एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली,प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.तर सूत्रसंचालन सेजल गायकवाड,जानव्ही तिगडीकर व सपना भंडारी या विद्यार्थिनींनी केले.
1) यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्यावतीने आयोजित व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानातील नवोपक्रम या मध्यवर्ती संकल्पनेवर या पाचव्या आंतरराष्ट्रीय
परिषदेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सचे प्रमुख सुनील देशमुख यांचे स्वागत करताना यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, यावरी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर डावीकडून इंड्यूरन्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे,दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक गोपाळ दळवी व आयबीएम कंपनीचे कार्यक्रम व्यवस्थापक मनोज चौधरी
2) यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्यावतीने आयोजित व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानातील नवोपक्रम या मध्यवर्ती संकल्पनेवर या पाचव्या आंतरराष्ट्रीय
परिषदेतविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट
ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सचे प्रमुख सुनील देशमुख.
3)यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्यावतीने आयोजित व्यवस्थापन
व माहिती तंत्रज्ञानातील नवोपक्रम या मध्यवर्ती संकल्पनेवर या पाचव्या आंतरराष्ट्रीय
परिषदेत ‘यशोमंथन’ या शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन करताना मध्यभागी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सचे प्रमुख सुनील देशमुख, यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर उपस्थित असलेले डावीकडून इंड्यूरन्स कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे,यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी,
दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक गोपाळ दळवी व आयबीएम कंपनीचे कार्यक्रम व्यवस्थापक मनोज चौधरी





















































