देशातील आगामी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शकांना पहाता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्ककडून हे ग्रहण २१ जूनला ऑनलाइन दाखविले जाणार आहे. तब्बल ११ वर्षांनी म्हणजे २०३१ ला हे सूर्यग्रहण परत दिसणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही चालू दशकातील शेवटची नामी संधी ठरणार आहे.
सध्या टाळेबंदी लागू असल्याने पिंपरी-चिंचवड सायन्स पार्ककडून हे ग्रहण संस्थेच्या फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवर ऑनलाईन दाखविले जाणार आहे. राजस्थान येथे जाऊन त्याचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जाणार आहे.
खगोल तज्ज्ञ आणि सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक म्हणाले, “आपल्याकडे यापूर्वी २६ डिसेंबर २०१९ ला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. दक्षिण भारतात हे ग्रह खंडग्रास स्वरुपातच दिसले. त्यावेळेस सूर्य जवळपास ९२ टक्के झाकला गेला होता. त्याची कडा बारिक होती. मात्र, येत्या २१ जूनला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य ९९ टक्के झाकला जाईल. साधारणतः सकाळी सव्वा नऊ वाजता सूर्यग्रहणाला सुरुवात होऊन दुपारी पाऊणे दोनपर्यंत हे सूर्यग्रहण राहील. साधारणतः ३६ सेकंद इतका वेळ सूर्याला बांगडीसारखी कडा दिसेल.”
उत्तर भारतात विशेषतः राजस्थान ते उत्तराखंडपर्यंतच्या पट्टयामध्ये २१ जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. राज्यात हेच ग्रहण खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे. मात्र, राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे त्यावर पावसाचे दाट सावट राहण्याची देखील शक्यता आहे.





















































