वाकड, (ppcnews.in)ता. १३ ऑगस्ट – उत्सव काळात ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेसर लाईट्सच्या वापरावर पूर्णतः बंदी असल्याचे वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी स्पष्ट केले.

आज वाकड पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी वाकड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणतेही मंडळ किंवा व्यक्ती डीजे, डॉल्बी किंवा लेसरचा वापर करताना आढळल्यास, त्यांचे साहित्य त्वरित जप्त करण्यात येईल.
“गणेशोत्सव, दही हंडी हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे, परंतु त्यातून होणारे ध्वनी व प्रकाश प्रदूषण समाजासाठी घातक आहे. त्यामुळे कायद्याने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. नियमभंग करणाऱ्या मंडळांवर आणि व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे माळी यांनी स्पष्ट केले.
तसेच, “फक्त गणेशोत्सवच नव्हे तर सर्वच सण-उत्सवांमध्ये हेच नियम सारखेच अंमलात आणले जातील,” असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी आणि मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.




















































