पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी:
ppcnews.in
महानगरपालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार शामभाऊ शांताराम जगताप यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून, “मी निवडणूक लढणारच,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जगताप कुटुंबातील राजकीय वारसा असलेले शामभाऊ हे लहानपणापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दिवस-रात्र लोकांच्या संपर्कात राहून काम करण्याची त्यांची पद्धत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. मनमिळाऊ स्वभाव, थेट संवाद व संघटनात्मक जिद्द यामुळे ते प्रभागातील तरुण आशादायी चेहरा ठरले आहेत. प्रभागातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आता शामभाऊ जगताप हे कोणता झेंडा हाती घेणार ही मतदार नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले शामभाऊ जगताप कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू असून, त्यांच्या अंतिम निर्णयावर प्रभागातील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.
या विश्वासावर आधारित प्रचाराला शामभाऊ कोणता झेंडा हाती घेऊन घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधणार आहेत हा उत्सुकतेचा विषय प्रभागांमध्ये राहिला आहे. “आगामी पंचवार्षिक काळात प्रभागात परिवर्तन घडवणार,” असा निर्धार त्यांनी सांगितला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल हा केवळ प्रक्रियेचा भाग नसून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा ठरवणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निमित्ताने प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. ऐतिहासिक पर्वाच्या शुभारंभाचे साक्षीदार होण्यासाठी ग्रामस्थ व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शामभाऊंनी केले. नागरिकांचा सहभाग हाच विकासाचा पाया, असे मत त्यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत स्थानिक समस्या प्राधान्य देत लोकाभिमुख धोरण राबवण्याची गरज अधोरेखित होत असून, प्रभागवासीयांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे.
अर्ज दाखलाच्या निमित्ताने पिंपळे गुरव येथील ज्ञानदीप बंगला निवासस्थान येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. प्रथम ग्राम दैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन चव्हाण आळीमार्गे पिंपळे गुरव गावातून शिवाजी चौक या ठिकाणी पोहोचणार. तिथे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेऊन पुढे सुवर्णपार्क, तुळजाभवानी नगर, पंचरत्न नगर, गुरुदत्त नगर मार्गे रामकृष्ण मंगल कार्यालय कडून ६० फुटी रस्त्याने चंद्रभागा हॉलपर्यंत पदयात्रा पोहोचेल. या पदयात्रेत स्थानिक नागरिकांचा सहभाग असून, विकासाच्या योजना मांडणार असल्याचे सांगितले जाते.
या निवडणुकीत प्रभागातील बदलत्या समीकरणांमुळे इतर उमेदवारांकडूनही हालचालींना वेग आला असून, मतदारांच्या अपेक्षांनुसार विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित प्रचार अपेक्षित आहे.





















































