पिंपरी,(ppcnews.in )ता. १६ : ” गायींमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो. प्रत्येक मंदिराने एका गायीचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविल्यास भारताला विश्व- गोमातेचा दर्जा मिळू शकतो ”, असे प्रतिपादन संत बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानतेश जालिहाळ यांनी शुक्रवारी (ता. १५) जाधववाडी, चिखली येथे व्यक्त केले.
देशाच्या स्वात्रंत्र्यदिनानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात संत बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमाता गोमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे पॅनेल न्यायाधीश रमेश उमरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जालिहाळ म्हणाले, ” भूमिपूजन, वास्तुशांती, देवाची प्राणप्रतिष्ठापना अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये गायीचे पूजनहि व्हायला हवे. त्यासाठी कोणाला गायी हव्या असतील तर त्या मी मोफत उपलब्ध करून देतो. थेरगाव येथे आमच्या संत बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आजारी, जखमी गायींवर मोफत उपचार केले जातात. सुमारे २० वर्षांपूर्वी मी आजारी, जखमी गायींवर उपचार करण्यास सुरवात केली. यासाठी माझे विविध ठिकाणी सत्कारही झाले. ”
यावेळी मंदिरात राष्ट्रभक्ती संस्करण महाकवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रभक्तीपर विविध कविता सादर केल्या. त्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली. उमरगे यांनी लिहिलेल्या ‘ आईच्या मायेचा स्पर्श ‘ या काव्यसंग्रहाच्या पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वाटप करण्यात आले. कादंबरी जाधव, किशोर पांचाळ अशा अनेक कवीनी सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी चांगली दाद दिली. नितीन चिलवंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. त्यामध्ये १५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.





















































