ppcnews.in
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचा पॅनल सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपाचा अत्यंत भक्कम, विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जोडलेला पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अमित गोरखे म्हणाले की, केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची प्रक्रिया तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला मोठे मताधिक्य मिळत आहे. या विकासकेंद्रित धोरणांवर जनतेचा वाढता विश्वास हा भाजपाच्या वाढत्या जनाधाराचे प्रमुख कारण आहे.
तरुणांचा भाजपाकडे वाढता ओढा
भारतीय जनता पार्टीचे विकासाचे धोरण, कामाची शिस्तबद्ध पद्धत आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टी पाहता मोठ्या संख्येने तरुण भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात तरुणांमध्ये भाजपाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हे परिवर्तन आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे आमदार गोरखे यांनी नमूद केले.
मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर तरुणांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत शहरातील २५० हून अधिक तरुणांनी जाहीर पक्षप्रवेश केला असून, हा भाजपाच्या वाढत्या विश्वासार्हतेचा स्पष्ट पुरावा आहे.
त्याचप्रमाणे ओम शिवशक्ती मित्र मंडळातील अनेक सदस्य व मतदारांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. यासोबतच शहरातील कामगार संघटनांचा देखील भाजपाला ठाम पाठिंबा मिळाला असून, श्रमिक वर्गामध्ये सरकारच्या कामाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय माळी समाजातील जिरेमाळी संघटनेने देखील भारतीय जनता पार्टीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला असून, विविध समाजघटक भाजपाच्या विकासाभिमुख विचारधारेसोबत जोडले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. हा सर्वसमावेशक पाठिंबा आगामी निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड : रोजगार व गुंतवणुकीचे केंद्र
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ इमारती किंवा रस्त्यांपुरता मर्यादित नसून तो रोजगारनिर्मितीशी जोडलेला असला पाहिजे, असे स्पष्ट मत आमदार गोरखे यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, Microsoft सारखी जागतिक दर्जाची कंपनी पिंपरी-चिंचवड शहरात येत असून, यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे IIM सारखी नामांकित शैक्षणिक संस्था पिंपरी-चिंचवडमध्ये येत असल्याने शहराची शैक्षणिक व बौद्धिक ओळख अधिक मजबूत होणार आहे.
हा विकास उद्याच्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणारा असून, “विकास फक्त दिसणारा नसून तो रोजगार देणारा असला पाहिजे,” असे आमदार गोरखे यांनी ठामपणे सांगितले.
आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठे प्रयत्न
पिंपरी-चिंचवड शहरासाठी AIIMS सारख्या दर्जेदार रुग्णालयासाठी तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले. नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक गुंतवणुकीत पिंपरी-चिंचवडचा मोठा वाटा
महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के गुंतवणूक चाकण, रांजणगाव, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यात येत असून, हा विषय पिंपरी-चिंचवडसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. या औद्योगिक विकासामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे.
राज्याच्या युवा धोरणात सक्रिय सहभाग
आमदार अमित गोरखे हे राज्याच्या युवा धोरण समितीचे निमंत्रित सदस्य असून, तरुणांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बाबी धोरणामध्ये समाविष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे युवा धोरण आकार घेत असून, महाराष्ट्रातील युवकांना भविष्यासाठी सक्षम बनवण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
AI व डीपफेकसारख्या नव्या आव्हानांवर धोरणात्मक भूमिका
भविष्यात AI च्या माध्यमातून तयार होणाऱ्या डीपफेक व्हिडिओंसारख्या गंभीर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली. तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत पिंपरी-चिंचवडचा मोलाचा वाटा
२०२९ पर्यंत भारताला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून, या प्रक्रियेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा मोठा वाटा असणार असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. यासाठी शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी, हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात होणारे पाणी साचणे, तसेच दळणवळणाच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.
गिग वर्कर्सच्या पाठीशी सरकार ठाम
गिग वर्कर्सचा प्रश्न ऐरणीवर असून, जे मेहनत करतात त्यांच्या पाठीशी आमचे सरकार ठामपणे उभे आहे, असे आमदार गोरखे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस सरकार गिग वर्कर्सच्या हक्कांसाठी संवेदनशील असून, हा विषय येत्या काळात विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




















































