वाकड: प्रतिनिधी:
ppcnews.in
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत असून, त्याचाच एक भाग म्हणून आज भोसरी प्रभाग क्रमांक ६ येथे आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवार लांडगे जया विशाल यांच्या प्रचारार्थ भव्य व जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेस आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रकाशजी जरवाल, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजितजी फाटके पाटील तसेच पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आम आदमी पार्टीच्या पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या राजकारणाची भूमिका मांडली. भ्रष्टाचारमुक्त कारभार, सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि मूलभूत सुविधा हा आम आदमी पार्टीचा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, आम आदमी पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, निवडणुकीनंतरही नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी पक्षसंस्था आहे. दर्जेदार शिक्षण, सुलभ व परवडणारे आरोग्य, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व इतर नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी ठोस आणि कालबद्ध विकास आराखडा आम आदमी पार्टीकडे आहे.
उमेदवार लांडगे जया विशाल या प्रभागातील स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या, सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध उमेदवार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. “काम करणारा, लोकांमध्ये राहणारा आणि लोकांसाठी लढणारा उमेदवार” अशी त्यांची ओळख असल्याचेही सांगण्यात आले.
सभेला महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत बदलासाठी सज्ज असल्याची भावना व्यक्त केली. भोसरी परिसरात आम आदमी पार्टीला मिळणारा वाढता पाठिंबा आगामी निवडणुकीत परिवर्तनाचा स्पष्ट संकेत देत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
जनतेचा विश्वास, प्रामाणिक नेतृत्व आणि विकासाची ठोस दिशा आम आदमी पार्टीच भोसरीचा खरा पर्याय आहे.




















































