पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड :
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सरस्वती सहकारी गृह रचना (म्हाडा), मोरवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला स्वतःचे संविधान प्राप्त झाले आणि देश खऱ्या अर्थाने सार्वभौम, लोकशाहीप्रधान राष्ट्र बनला, या ऐतिहासिक घटनेचे स्मरण यावेळी करण्यात आले.
भारतातील विविध जाती, धर्म आणि पंथ असूनही “विविधतेत एकता” हेच देशाचे मोठे सामर्थ्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. संविधानाचा आदर राखणे व लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पथविक्रेता समिती सदस्य मा. किसन उर्फ माऊली भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या गजरात ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सोसायटीत लहान मुलांचे गॅदरिंग आयोजित करण्यात आले होते. चिमुकल्यांचा उत्साह आणि देशभक्तीपर कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी सरस्वती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीचे चेअरमन जिजाबराव जाधव, सचिव राहुल पवार, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भांडार अधिकारी मा. बुधा दाभाडे, विद्युत अभियंता मा. विशाल रेंगडे, सोमनाथ शिंदे, संतोष अवधूत, शिवाजी माने, तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मा. अमोल चौगुले यांच्यासह सोसायटीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, देशासाठी योगदान देण्याचा संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
















































