पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘शिवराय’ या पुस्तकाच्या ५,००० प्रती खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती अधिक व्यापकपणे पोहोचावी, या उद्देशाने ही पुस्तके शाळा, वाचनालये व शैक्षणिक संस्थांमध्ये वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर मतभेद समोर येत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या खरेदी प्रक्रियेवर आक्षेप घेत, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत तसेच पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
काळभोर यांनी आरोप केला आहे की, लेखक नामदेव जाधव हे विषयाचे तज्ञ नसून केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी पुस्तक खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, सोशल मीडियावर नागरी समस्यांबाबत पोस्ट शेअर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता थेट पुस्तक खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या हा विषय शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















































