पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक २२ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते.
तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही चा आधार
घटनेचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून एका महिलेचा संशयित सहभाग आढळून आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. पवार चाळ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) हिला ताब्यात घेतले.
चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, बनावट चावीचा वापर करून घरफोडी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीस गेलेले १० तोळे सोन्याचे दागिने (किंमत १३.८७लाख रुपये) जप्त केले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग अव्हाड, अ अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक भारत करे महिला पोलीस अश्विनी सावंत, शरद खैरे, राजेंद्र खेडकर ,राजेंद्र गिरी ,महेश गायकवाड , प्रशांत कसबे, शिवाजी मरकड तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास हा पोहवा किशोर सांगळे हे करीत आहेत.
पोलिसांची सतर्कता आणि जलद कारवाईमुळे गुन्हा उघडकीस येऊन मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



















































