– नवलकिशोर राम यांचे मत; बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
– बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या अध्यक्षपदी अजय गुजर यांची फेरनिवड
पिपीसी न्यूज नेटवर्क,
पुणे, ता. २५: “पुण्याची ओळख ‘पेन्शनर्स पॅराडाईज’ अशी असली, तरी संस्कृती, इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या शहराने स्वतंत्र वैशिष्ट्य जपले आहे. नियोजनबद्ध विकास, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि उद्योगांच्या विस्तारामुळे आज पुणे आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. शहराच्या या जडणघडणीत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) यांसारख्या संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात नवलकिशोर राम बोलत होते. हॉटेल ग्रँड शेरेटोन येथे आयोजित समारंभात अतिरिक्त कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश मेंडा, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव डॉ. महेश राठी, खजिनदार सुशील अग्रवाल, मावळते उपाध्यक्ष महेश मायदेव, सचिव सी. एच. रतलानी, सुनील मते आदी उपस्थित होते. अध्यक्षपदी अजय गुजर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
नवलकिशोर राम म्हणाले, “पुणे शहराने संतुलित विकासाचा आदर्श ठेवला आहे. आयटी, शिक्षण, वैद्यकीय सेवा, कला आणि परवडणारी घरे तसेच व्यावसायिक जागा यामुळे शहराचा वेगाने विस्तार होत आहे. देशातील सुमारे ५०० ‘जीसीसी’ पुण्यात कार्यरत असून, स्टार्टअपसाठीही हे शहर आकर्षणाचे केंद्र बनले आहे. शहरातील विकासाला गती मिळाली असली, तरी नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये काम करण्याची गरज आहे. झोपडपट्ट्यांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मर्यादा आणि नागरिकांशी संवादाचा अभाव या आव्हानांवर काम करावे लागेल. शाश्वत विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, सक्षम इकोसिस्टम आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. मेट्रो प्रकल्प सुरू झाला असला, तरी स्थानिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासह ‘पीएमपीएमएल’चा प्रभावी वापर व्हावा.”
दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत अजय गुजर म्हणाले, “असोसिएशनच्या कार्यालयाचे नूतनीकरण, बांधकाम क्षेत्रातील सर्व उत्पादक, साहित्य आणि तंत्रज्ञान याचे भव्य प्रदर्शन, राष्ट्रीय स्तरावरील ‘बीएआय’ सदस्यांचे अधिवेशन घेणार आहोत. बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. साईट व्हिजिट्स, तांत्रिक चर्चासत्रे आणि नवीन मशिनरी व तंत्रज्ञानाविषयी ज्ञानवृद्धीवर भर दिला जाईल. शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून बांधकाम क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासह कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन, ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर’ स्पर्धा तसेच ग्रामीण भागात मुलींसाठी स्वच्छतागृह उभारणीसारखे उपक्रम हाती घेणार आहोत.”
बाळासाहेब वाघ म्हणाले, “कामगारांच्या कल्याणासाठी कामगार आयुक्तालय आहे. कामगार व त्यांच्या मुलांसाठी शिक्षण, आरोग्य व विमा आदी योजना आहेत. बिल्डर आणि कामगार आयुक्तालय यांच्यातील समन्वय वाढला, तर कामगारांना त्याचा लाभ चांगल्या पद्धतीने होईल. एकमेकांना पूरक भूमिकेतून काम केले, तर कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अधिक सोयीचे होईल. बिल्डर्स असोसिएशनने यामध्ये पुढाकार घ्यावा.”
यावेळी नियामक मंडळातील रणजित मोरे, जगन्नाथ जाधव, डॉ. आर. बी. कृष्णानी यांचा, तसेच वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश मेंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश राठी यांनी आभार मानले.

















































