पुणे : कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनही एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली नाही. जर त्यांना १५ मार्च पर्यंत अटक केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे यांनी दिला. यावेळी पत्रकार परिषदेत सतीश काळे, प्रमोदसिंह गोतारने, विजय जगताप, आय. टी. सय्यद, सचिन गोळे, रशीद सय्यद, तोसीफ शेख आदी उपस्थित होते.
तुळवे म्हणाले की, एकबोटे नेहमीच अशी वक्तव्य करून राजकीय फायदा मिळवितात. त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो. जातीय दंगली घडू शकतात. मात्र कोणताही बहुजन समाज त्यांच्या वक्तव्यला भुलणार नाही. पोलिसांनी एकबोटेंना तात्काळ अटक करावी. त्यांना जर ते सापडत नसतील तर आम्ही त्यांचा शोध घेऊन पोलिसांच्या हवाली करू. त्यांना फरारी घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.
पुढे ते म्हणाले की, एकबोटेंनी एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बदनामी केली आहे. दहशत पसरविण्यासाठी वक्तव्याच्या भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. त्यांना १५ मार्च पर्यंत अटक करण्यात आली नाही तर राज्यातील बहुजन समाजाचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा त्यांनी दिला.