कोरोनामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी आज सोमवारी (दि. १) रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित केली आहे.
दरम्यान, आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात अर्थसंकल्पाची अमंलबजावणी सुरू केली आहे. तरीदेखील महासभेची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यानुसार सोमवारच्या सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाणार आहे. संचारबंदीमुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पालिकेचे एकूण १३३ नगरसेवक आहेत. सभा कामकाजासाठी किमान ४३ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक आहे.
रविवारी (दि. ३१) लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला आहे. मात्र सोमवारची पालिका सभा सोशल डिस्टन्सिंग ठेवून घेण्याचे नियोजन केले आहे. एका बाकावर दोन जणांप्रमाणे सभागृहात ८० नगरसेवक बसतात. प्रेक्षक गॅलरीत २० नगरसेवक बसू शकतात. सभागृहात खुर्च्या लावून इतर नगरसेवकांची सोय केली जाऊ शकते. तर, सर्व अधिकारी सभागृहाबाहेर बसतील. त्यानुसार महापौर उषा ढोरे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सभागृहाची पाहणी केली आहे.