पिंपरी, १४ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महानगरपालिकेसोबत संयुक्तरित्या राबवत आहे. या कामांतर्गत पिंपरी चिंचवड वाकड बायपास ते नवी सांगवी येथील मनपा परिसरातील मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गतची काम करण्यात येत आहे. परंतु सध्यस्थितीत काही ठिकाणी पुरपरिस्थिती, वादळवारामुळे किंवा नदीकाठच्या खासगी जागेमधील झाडे पडल्याची बातमी वर्तमान पत्रामध्ये येत असुन त्याची शहनिषा उद्यान विभागामार्फ़त करणेत येत आहे तसेच त्याचा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाशी संबध नाही असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्यस्थितीत सदर प्रकल्पामध्ये बाधित होणारे झाडांचे पुनर्रोपण, स्थानांतरण व तोडणेबाबतची मंजुरी करिता विषय वृक्ष संवर्धन समिती समोर ठेवणेत आला असून त्यास समितीमार्फत मान्यता प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सदर प्रकल्पामध्ये कोणत्याही झाडाचे पुनर्रोपण, स्थानांतरण व तोडणेबाबतची कार्यवाही केलेली नाही, वृक्ष संवर्धन समितीची मंजुरी मिळालेनंतर पुढील कार्यवाही करणेत येईल, अशी माहितीही पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात आली.





















































