पुणे शहरात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असून त्यांचेवर मनपाची रूग्णालये, खाजगी रूग्णालये व शासकीय रूग्णालये येथे उपचार केले जातात. या आजारातून मुक्त झाल्यानंतर रूग्णांना काही दिवसानंतर विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन होत असल्याचे आढळून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शन होत असून हे इन्फेक्शनप्रतिकारक शक्ती कमी असलेले रूग्ण व मधुमेह असलेले रूग्णांना होण्याचा संभव आहे. सदर इन्फेक्शन नाकाच्या आजूबाजूस होते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये जावून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते असे तज्ञांकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे व मेंदूपर्यंत पसरत आहे. याविषयी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचारांची आवश्यकता असून यावरील उपचार देखील महागडे असून गोरगरीबांना असे इन्फेक्शन झाल्यास त्यांना सदर उपचार घेणे शक्य नाही. सबब कोरोना होवून गेलेले रूग्णांचे तोंड व डोळे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करणे गरजेचे झालेले आहे. अन्यथा यामुळे देखील मृत्युचा दर वाढू शकतो. पुणे शहरात म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शनचे रूग्ण आढळून येत आहेत. पुणे शहरातीन खाजगी रूग्णालयातून कोविड होवून गेलेल्या रूग्णाचे डोळे म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे काढण्यात आले आहे अशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे. या रूग्णांच्या संख्येत वाढ होवू नये यासाठी वेळीच पुणे महापालिकेस पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा.
पुणे महापालिकेकडून ज्या रूग्णांना कोविड होवून गेला आहे व ज्या रूग्णांना मधुमेहासारखे आजार आहेत अशा रूग्णांची नियमित तपासणी करणेकामी तातडीने उपाय योजना राबविण्यात याव्यात. याविषयी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक तातडीने बोलविण्यात यावी अशी मागणी आबा बागुल यांनी मा.महापौर व मा.महापालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.
मा.स.कळावे, आबा बागुल कॉंग्रेस पक्षनेता पुणे मनपा