*’महाज्योती’च्या पुस्तक संच वाटप योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद*
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे. यावर्षी ओबीसी प्रवर्गातील 7 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक साहित्याचा संच वितरित करून देण्यात येत आहे. ‘पुस्तक संच वाटप योजने’चा लाभ घेण्यासाठी ‘महाज्योती’ने राज्यातील 36 जिल्ह्यातून अर्ज मागविले होते. राज्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात नोंदणी केली आहे. यामुळे जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मार्ग अधिक सुकर होणार. असा विश्वास ‘महाज्योती’चे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
पुढे बोलतांना मंत्री मा. श्री. अतुल सावे म्हणाले की, ‘महाज्योती’ द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत हा आहे. त्यानुसार ‘पुस्तक संच वाटप योजने’अंतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांमधून ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा संच दिले जात आहे. या नोंदणीत जळगाव विभागातून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, त्याचबरोबर अमरावती, धुळे, बुलढाणा, अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. ‘महाज्योती’च्या योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून खूप समाधान वाटते. या उपक्रमामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी पुढे यावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा माझ्याकडून मी देत असल्याचेही मंत्री मा. श्री. अतुल सावे म्हणाले.
*विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हेच उल्लेखनीय कार्याची पावती : प्रशांत वावगे*
राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. ‘महाज्योती’द्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘पुस्तक संच वाटप योजने’ला विद्यार्थ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे ‘महाज्योती’च्या उल्लेखनीय कार्याची पावती आहे, असा विश्वास ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत वावगे यांनी व्यक्त केले. पुढे बोलतांना श्री. वावगे म्हणाले की, ही योजना त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे, अशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो. त्यांच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छाही श्री. प्रशांत वावगे यांनी दिल्या.
*विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनोगत*
नागपुरचा विद्यार्थी आर्यनच्या आई किरण निमजे म्हणाल्या, ‘महाज्योती’ योजनेबद्दल आम्ही सरकारचे मनापासून आभार मानतो. माझ्या मुलाला जेईईची पुस्तके मिळाली आहेत आणि तो खूप आनंदी आहे. त्याने एसएससी बोर्डात 94% गुण मिळवले आणि इंजिनीअरिंग करण्याचा निर्धार करत 11वीपासूनच जेईईची तयारी सुरू केली. या महत्त्वाच्या पुस्तकांचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. त्यामुळे ही योजना आमच्यासाठी खरोखरच आधारवड ठरली आहे. आम्हाला या योजनेबद्दल वेबसाइटवरून माहिती मिळाली असेही किरण निमजे म्हणाल्या.
अमरावतीच्या आदित्यच्या आई शीतल नागरगोजे म्हणाल्या, ‘महाज्योती’ योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा आधार आहे. आम्हाला ही माहिती आमच्या शेजाऱ्यांकडून मिळाली. माझ्या मुलाने एसएससी मध्ये 80% गुण मिळवले आहेत आणि त्याने जेईईची तयारी सुरू केली आहे. ही योजना त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आम्ही खूपच भाग्यवान समजतो की आम्हाला ही संधी मिळाली आहे असे शीतल नागरगोजे म्हणाल्या.’