(पिपीसी न्युज)
प्रतिनिधी :अजय जाधव!
हगवणे प्रकरणात बोगस बँक अधिकाऱ्यांची भूमिका उघडकीस आली असून, इंडसइंड बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी जबरदस्तीने जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कारवाई आज (५ जून) पहाटे २.०७ वाजता करण्यात आली.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात लता हगवणे व शशांक हगवणे यांच्याविरोधात फसवणूक, विश्वासघात आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. (गु.र.क्र. ३३२/२५). या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इंडसइंड बँकेच्या लीगल मॅनेजरने पोलिसांना स्पष्ट केले की, गुन्ह्यातील जेसीबी मशीन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही रिकव्हरी एजन्सीला किंवा प्रतिनिधींना अधिकृत निर्देश दिलेले नाहीत.
मात्र, खालील तिघांनी बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली आणि ती आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
*अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :*
1. *योगेश राजेंद्र रासकर* (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे)
2. *गणेश रमेश पोतले* (वय ३०, रा. मोहितेवाडी)
3. *वैभव मोहन पिंगळे* (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे)
तिघांविरुद्ध फसवणूक, गैरवर्तन व बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून वसुली करणाऱ्या टोळ्यांविरोधात कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.





















































