पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पुणे : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग, महाराष्ट्र राज्य दलाने पुणे शहरातील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पान टपऱ्यांवर सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीविरोधात धडक कारवाई करत ४६४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ANTF कोल्हापूर येथील पोलीस हवालदार जितेंद्र तुपे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मुंढवा परिसरातील “ठाकूर पान शॉप” या टपरीवर गांजाची विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाईचे नियोजन करण्यात आले.
या संयुक्त कारवाईत ANTF कडील पोलीस उपनिरीक्षक आदलिंग, सहाय्यक पोलीस फौजदार अशोक आटोळे, पोलीस हवालदार जितेंद्र तुपे, चेतन चव्हाण, श्रीकांत साबळे तसेच मुंढवा पोलीस स्टेशनचे API गणेश पिंगुवाले, अधिकारी योगेश राऊत जाधव व धुमाळ यांच्या पथकाचा सहभाग होता.
पथकाने ठाकूर पान शॉप येथे छापा टाकत आरोपी अरविंद जगतपाल यादव याच्या ताब्यातून ४६४ ग्रॅम गांजा जप्त केला. अंमली पदार्थ विक्रीसाठी साठवलेला हा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे शहरात पान टपऱ्यांवरून अंमली पदार्थ विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, शहरभर अशा ठिकाणांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.



















































