पुणे :(ppcnews.in)
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवारी, दिनांक १४ जून २०२५ रोजी ‘लक्ष्य’ या शास्त्रीय एकल नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला पुण्यातील रसिक प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे आयोजित या कार्यक्रमात विविध नृत्य शैलींतील वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम नृत्यशैलीत अथर्व चौधरी यांनी केली.अत्यंत निपुणतेने नृत्य सादर केले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणास उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.त्यानंतर डॉ. देविका बोरठाकूर यांनी आसाममधील सत्तरीया नृत्यशैलीत सादरीकरण करत सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.
प्रसिद्ध कुचीपुडी नृत्यांगना वैजयंती काशी यांच्या सादरीकरणाने समारोप झाला. त्यांच्या अनुभवसंपन्न अभिव्यक्ती आणि नृत्यातील नेमकेपणामुळे रसिक भारावून गेले.
‘लक्ष्य’ हा कार्यक्रम भारतभरातील विविध नृत्यशैलींना एक व्यासपीठ देतो. ही सांस्कृतिक परंपरा जोपासण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर, मनीषा साठे, शमा भाटे,लीनता केतकर,नीलिमा आद्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सृष्टी हिरवे यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकीर्डे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम हा भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारा २४८ वा कार्यक्रम होता.
कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य होता. पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.