भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे:(ppcnews.in)
भारतीय विद्या भवन, पुणे केंद्र आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ज्येष्ठ गायिका सौ.शुभदा देशपांडे यांच्या ‘कलारंग’ या सांगीतिक मैफलीला पुणेकर रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवार,दि.१९ जुलै २०२५ रोजी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात संध्याकाळी ६ वाजता झालेल्या या मैफलीने उपस्थित रसिकांना एक अविस्मरणीय संगीत अनुभव दिला.

शुभदा देशपांडे यांनी राग नंद गाऊन मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पं. गिरिजादेवी यांचा ‘दिवाना किया शाम’ हा दादरा आणि पारंपरिक होरी अत्यंत भावपूर्ण सादर केली. ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ यासारखी गीते,नाट्यगीते प्रभावीपणे सादर केली. ‘पंढरीचा वास’, ‘निसीदिन बरसत नैन हमारे’, ‘इतना तो करना स्वामी’, ‘नाही पुण्याची मोजणी’ अशी विविध भजने सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी संकीर्तनाने केला.मनीषा जोशी यांनी प्रास्ताविक केले.

या गायनाला संवादिनीवर माधव लिमये, तबल्यावर सौरभ गुळवणी आणि तालवाद्य वादनावर विनायक दीक्षित व ओंकार जोशी यांनी सुरेख साथ दिली. गायन आणि वाद्यसंगत यांचा सुरेल मिलाफ रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठसणारा ठरला.
‘कलारंग’ हा भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील २५३ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.या संगीतमय सायंकाळी पुण्यातील रसिकांना एकसंध आनंदाची अनुभूती दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील हा कार्यक्रम एक अविस्मरणीय गानमैफल ठरली..





















































