महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. एप्रिल, मे मध्ये होणाऱया या परीक्षा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलल्या होत्या.
एमपीएससीने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब- संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोक्हेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यात कोरोनाची साथ वाढत असल्याने एमपीएससीने या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील वर्षात नवीन पदभरती होणार नाही, असेही जाहीर केले होते. त्यामुळे या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. एमपीएससीनेही याबाबत काहीच माहिती दिली नव्हती.
विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले आहेत तर परीक्षा घ्यावीच लागेल असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात होते. त्यानुसार एमपीएससीने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. एमपीएससीने परीक्षा जाहीर केलेल्या असल्या तरी सोशल डिस्टन्स ठेवून परीक्षा घेण्याचे आव्हान आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. एमपीएससीने याबाबत काहीच माहिती दिलेली नसली तरी कोरोनाचा आढावा वेळोवेळी घेऊन त्याबाबत माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळाकर उपलब्ध आहे.