पिंपरी-चिंचवड (ppcnews.in)| २८ ऑगस्ट २०२५
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी तब्बल १२६ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या यादीत जुने-नवे चेहरे एकत्र दिसून येतात, मात्र काही ठाम कार्यकर्त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरत आहे.
विशेषतः सचिन काळभोर यांना नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आणि स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटू लागला असून, पक्षांतर्गत काही ताणतणावही स्पष्ट होऊ लागले आहेत.
सचिन काळभोर हे पूर्वी भाजप पिंपरी चिटणीस पदावर कार्यरत होते आणि त्यांची ओळख एक आक्रमक, जमीनवरचे काम करणारे कार्यकर्ते म्हणून आहे. त्यांनी अनेकदा शहरातील नागरी समस्यांवर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. काळभोर हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांचे समर्थक मानले जातात. याउलट, त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे समजते.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांना नव्या कार्यकारिणीत डावलल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढण्याची चिन्हे आहेत.
याशिवाय, अमोल थोरात आणि महेश कुलकर्णी यांना देखील या नव्या कार्यकारिणीत स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
नव्या कार्यकारिणीमुळे भाजप शहरात नवचैतन्य निर्माण होईल की कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून येईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि गटांमध्ये उभी राहणारी दरी पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

मी भारतीय जनता पक्षाचे काम निष्ठेने प्रमाणिक पणाने करणार आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी सामाजिक कार्यकर्ते




















































