अजय जाधव प्रतिनिधी
पुणे ग्रामीण : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग आणि यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले असून, खामगाव (ता. दौंड) येथे छापा टाकून ९ किलो ७५८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ANTF कोल्हापूर येथील पोलीस हवालदार जितेंद्र तुपे व चेतन चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खामगाव परिसरात अंमली पदार्थ साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तातडीने संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.
या कारवाईत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, अक्षय मोरे तसेच पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, दत्ता काळे, हिरामण खोमणे, गणेश कुतवळ यांचा सहभाग होता. पंचांसह फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
पथकाने खामगाव येथे छापा टाकत आरोपी आकाश अशोक मोहिते याच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेला गांजा हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे एकूण वजन ९ किलो ७५८ ग्रॅम इतके असून, त्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागात अंमली पदार्थांविरोधात मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



















































