पिपीसी न्यूज नेटवर्क
पुणे | प्रतिनिधी :
पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला (काका) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
महापौर पदाची जबाबदारी अत्यंत शालीनता, संयम आणि पारदर्शकतेने पार पाडणारे नेतृत्व म्हणून शांतीलाल सुरतवाला यांची ओळख होती. पुण्याच्या संस्कृतीला साजेसे काम, सभ्य राजकारण आणि जनतेशी थेट संवाद हे त्यांच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी कार्यात मोलाचे योगदान दिले. अनेक युवकांना सामाजिक कार्याकडे वळवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. लोकप्रतिनिधी म्हणून विकासासोबतच मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी पिढी त्यांनी घडवली.
त्यांच्या निधनाने पुण्याने एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख लोकप्रतिनिधी गमावला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
शांतीलाल सुरतवाला (काका) यांचे कार्य पुणेकरांच्या स्मरणात सदैव राहील.















































