घराघरात जाऊन नागरिकांच्या प्रश्नांचा घेतला आढावा
पिंपरी | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या घराघरातील जनसंपर्क अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत कार्यकर्ते थेट नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत.
या अभियानादरम्यान विशालनगर, कस्पटे वस्ती परिसरासह आयटी क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, दैनंदिन नागरी सोयी-सुविधा तसेच प्रशासनातील पारदर्शकता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
जनसंपर्क मोहिमेद्वारे केवळ समस्या ऐकून घेणे नव्हे, तर त्यावर ठोस उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले. प्रभागातील नागरी प्रश्नांवर सातत्याने काम केल्याचा अनुभव असून, प्रत्यक्ष कृतीतून विश्वास निर्माण करण्यावर पक्षाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संवादात्मक मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रभागाच्या विकासासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. प्रभाग २६ मधील समस्या मुळातून सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हा संपर्क उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे नागरिकांनीही सांगितले.



















































