ppcnews.in
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३१ (क) मधून प्रबळ विजय दावेदार म्हणून ओळख असलेल्या पायल अमित पसरणीकर या निवडणूक रिंगणात कायम राहणार असल्याचे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले. मंगळवार, दिनांक २ रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता.
नवी सांगवी–पिंपळे गुरव प्रभागातून अमित पसरणीकर यांची उमेदवारी प्रमुख मानली जात होती. जगताप कुटुंबीयांचे हक्काचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. खुद्द अश्विनीताई जगताप यांनी याबाबत जाहीरपणे उल्लेखही केला होता. मात्र, उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना काही नाट्यमय घडामोडींमुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले.
नागरिकांमध्ये रमणारा नेता अशी प्रतिमा असलेल्या अमित पसरणीकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक वर्षांची जनसेवा, त्यातून तयार झालेले संबंध आणि शब्द दिल्यानंतरही उमेदवारी नाकारण्यात आल्याची भावना नवी सांगवीतील नागरिकांमध्ये तीव्र होती. त्यामुळे ‘शब्द देऊन फसवले’ गेल्याची भावना उफाळून आली.
या पार्श्वभूमीवर नवी सांगवीतील आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. “भाऊ, आता माघार नाही” हा संदेश देण्यासाठी नागरिक अमित पसरणीकर यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले. नागरिकांची वाढती गर्दी पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात होता, मात्र सर्वजण अमित पसरणीकर यांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून होते.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारी देताना प्रभाग पातळीवर समतोल राखला गेला नसल्याची भावना व्यक्त होत असून, सर्व उमेदवार पिंपळे गुरव भागातून देण्यात आल्याने नवी सांगवीवर अन्याय झाल्याचा सूर उमटत आहे.
अखेर नवी सांगवीकरांच्या भावनांचा आदर राखत अमित पसरणीकर यांनी आपली पत्नी पायल अमित पसरणीकर यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३१ (क) मधील विजय दावेदारी कायम असून, या प्रभागातील लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.





















































