देशावरील कोरोना संकट लक्षात घेता मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळाने यंदा दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो त्याठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबीर भरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी घातलेल्या या सादेला विविध गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळ दरवर्षी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करते. देशभरातून भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई मधील लालबाग येथे येतात. कोट्यवधी लोकांचे श्रद्धा स्थान असलेल्या गणेश मंडळाने यंदा सामाजिक भान जपत प्रथमच दरवर्षी प्रमाणे मूर्ती विराजमान न करता रक्तदान, प्लाझ्मादान शिबीर भरवणार आहे. ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाने पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच वीर जवान जे देशासाठी सीमेवर शहीद झाले त्यांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये 25 लाख रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे.




















































