सातारा: भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शंभुराज देसाई हे उदयनराजेंना मुजरा करताना दिसत आहेत.
शंभुराज देसाई कोल्हापूरला जात होते, त्यावेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने चालले होते, तेव्हा वाटेत शंभुराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडीही ताफ्यासोबत घेतली, त्यानंतर शिरूळ एमआयडीसी महामार्गावर उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. गाडीतून बाहेर आल्यावर शंभुराज देसाई यांनी भररस्त्यात उदयनराजे भोसलेंना मुजरा केला. दोघांचीही ही भेट कोल्हापूरनजीक शिरूळ एमआयडीसी महामार्गावर घडली. पण ही भेट भलतीच चर्चेत आली.
अचानक झालेल्या भेटीत शंभुराज देसाईंनी थेट उदयनराजेंना मुजरा केला. विशेष म्हणजे तो क्षण काहींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केला आणि तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही, साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही गेल्या काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई म्हणाले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंची समजूत काढणार असल्याचंही गेल्या काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई यांनी सांगितलं होतं. उदयनराजेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कुठेही कमी पडत नाही, उदयनराजेंची समजूत काढणार असल्याचं देसाईंनी सांगितले होते. आता साताऱ्यातील या दोन नेत्यांची कोल्हापुरातील ही भेट चांगलीच चर्चेत आली होती.