पिंपरी-चिंचवड, (ppcnews.in)१७ ऑक्टोबर (प्रतिनिधी):
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० (संभाजी नगर, शाहूनगर, मोरवाडी-म्हाडा, दत्त नगर, विद्या नगर आणि इंदिरा नगर) येथील नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आयोजित ‘जनसंवाद सभा’ काल (गुरूवार, १६ ऑक्टोबर) संभाजीनगर येथील श्री दत्तमंदिर परिसरात उत्साहात पार पडली.
प्रभागातील नागरिकांनी वीज, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पोलिस सुरक्षा तसेच अन्य स्थानिक व नागरी प्रश्नांवर आपल्या तक्रारी, मागण्या आणि सूचना थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शासनातील संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित असल्याने, अनेक समस्यांवर जागेवरच त्वरित उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

सभेदरम्यान अनेक तक्रारी तात्काळ सोडवता येण्यासारख्या होत्या, ज्यावर अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. ज्या समस्यांसाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार, संबंधित खात्यांकडून तपासणी किंवा सविस्तर कार्यवाही आवश्यक होती, त्या प्रशासनाच्या वरिष्ठ/संबंधित खात्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आले. ही महत्त्वपूर्ण जनसंवाद सभा आमदार अमित गोरखे यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.
“आजच्या ‘जनसंवाद सभेचे’ खरे यश नागरिकांच्या सक्रिय आणि मोठ्या सहभागातून सिद्ध झाले आहे,” असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केले. त्यांनी पुढे नमूद केले, “विशेषतः प्रभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सक्रिय मंडळे आणि सोसायटीचे अध्यक्ष यांनी ज्या तळमळीने उपस्थित राहून समस्या मांडल्या, त्यातून लोकहितासाठी आपली एकजूट व बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. या सामूहिक प्रयत्नातूनच आपण लवकरच ‘विकसित प्रभाग, समृद्ध नागरिक’ हे उद्दिष्ट साध्य करू शकतो.” तसेच त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील १० दिवसांच्या आत प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आणि जर कोणी अनाधिकृतपणे काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. “यापुढेही नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक गतिमान राहील, याची मी पूर्ण ग्वाही देतो,” असे आश्वासन आमदार गोरखे यांनी शेवटी दिले.
या सभेला प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मा. नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, हिंगे ताई, केशव घोळवे, शाम मोरे, दिलीप सावंत, अजित भालेराव, संदीप चव्हाण, पंकज दलाल, हरी मामा, सय्यद पटेल, संदीप थोरात, विलास सपकाळ, जितेंद्र छाब्रा, काजी काक, वाडकर काका, पात्रे ताई आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.





















































