
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत घेता येणार लाभ
पुणे : केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून विना शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा लाभ विना शिधापत्रिका धारकांना घेता येणार आहे. यापूर्वी विना शिधापत्रिका धारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नव्हता आता अशा नागरिकांना पुढील दोन महिने प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत. विना शिधापत्रिका धारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील क्षेत्रीय कार्यालयाकडून उपलब्ध होणारे अर्ज नगरसदस्याकडून घेवून ते अर्ज भरुन नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिनांक ३०/०५/२०२० अखेरपर्यंत जमा करावेत असे महापौर सौ.माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते श्री ढाके यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अर्थ सहाय्य पॅकेज जाहिर केले आहे. या पॅकेज अंतर्गत केंद्राच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांनाही मे व जून २०२० या दोन महिन्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सौ.माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते श्री.ढाके यांनी केले आहे.



















































