सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊन टप्प्याटप्याने खुले करण्यासाठी सुरू केलेले ‘मिशन बिगिन अगेन फेज – २’ आज शुक्रवार ५ जून पासून सुरू होत आहे. यामुळे मुंबईत दुकाने, मार्केट, बाजारपेठा सुरू होणार आहेत. एक दिवसाआड ही दुकाने सुरू राहणार असून रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी खुली राहतील तर डाव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडली जाणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहतील.
मुंबईतील अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढून नव्या गाईडलाइन जारी केल्या आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये ‘शटर डाऊन’च राहणार,
गर्दी, धोका टाळण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. या ठिकाणी मेडिकल, इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवाच सुरू असतील. याशिवाय रविवारीही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच राहतील. नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्डच्या सहायक आयुक्तांवर असेल.
फक्त अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी वाहतूक
शुक्रवारपासून सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नसली तरी अत्यावश्यक सेवा-कारणांसाठी टॅक्सी-कॅब सुरू करण्यास परवानगी असेल. यामध्ये ड्रायव्हर आणि फक्त दोनच प्रवासी असतील.
घरोघरी वृत्तपत्रे 7 जून तर खासगी कार्यालये 8 जूनपासून
मिशन बिगिन अगेन अंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 जूनपासून सोशल डिस्टंन्स पाळून जॉगिंग, सायकलिंग, वॉकिंग, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यात दुकाने सुरू होत आहेत. तर तिसर्या टप्प्यात कर्मचार्यांची 10 टक्के उपस्थिती ठेवून खासगी कार्यालये सुरू करता येणार आहेत. शिवाय 7 जूनपासून आवश्यक खबरदारी घेऊन घरोघरी वृत्तपत्रे वाटप सुरू होणार आहे.