अधिकारी-कर्मचारी गैरहजर; कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी
पिपीसी न्यूज नेटवर्क
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या कार्यालयाला सोमवारी (दि. १६ मार्च २०२६) टाळे लागल्याचे समोर आले असून त्या दिवशी विभागातील अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहिल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागल्याची तक्रार पुढे आली आहे.
नागरिक विविध कामानिमित्त कार्यालयात आले असता कार्यालय बंद असल्याने त्यांना विनाकारण हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. नागरिकांना भेट देण्यासाठी वेळ न देता उलट कार्यालयाला टाळे लावण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.
या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.



















































