*पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मराठी चित्रपट असोसिएशन आयोजित महोत्सवात ७२०० रसिकांनी घेतला लाभ*
*पिंपरी, २५ मार्च २०२५ :* नाट्यगृहात प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गेली दोन दिवस प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मराठी चित्रपट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाचे.
‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्यगृहात चित्रपट’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. या उपक्रमांचे २४ व २५ मार्च दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाममात्र दरात मराठीतील दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने अनेक प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महोत्सवाच्या दोन्ही दिवशी एकूण ७ हजार २०० नागरिकांनी मराठी चित्रपटांचा आनंद लुटला.
यामध्ये नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट नाममात्र दरात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. या चित्रपट महोत्सवात सोमवारी (२४ मार्च) ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ हे चित्रपट दाखवण्यात आले. तर, मंगळवारी (२५ मार्च ) रोजी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ चित्रपट दाखवले गेले. मराठी भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मराठीतील नवीन चित्रपट नाममात्र दरात पाहण्याची संधी मिळाल्याने प्रेक्षकांनी सर्वच चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला.
महोत्सवासाठी आयुक्तांचा पुढाकार
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आल होता. याला नागरिकांना प्रचंड प्रतिसाद दिला होता. ही संकल्पना आवडल्याने चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने लगेच मराठी चित्रपट असोसिएशनशी संपर्क साधून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना नाममात्र दरात चित्रपट दाखवण्यासाठी महानगरपालिकेच्या साथीने हा महोत्सव आयोजित करण्याचे सुचवले होते.
चित्रपटाच्या अगोदर राष्ट्रगीत…!
देशभरात चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत म्हटले जाते. त्याचप्रमाणे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे देखील प्रत्येक सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
मराठी भाषेचे संवर्धन , प्रचार व प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते.
मराठी चित्रपट महोत्सव हा याच उपक्रमांचा एक भाग होता. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून असे उपक्रम मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
मराठी चित्रपटांना मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मराठी चित्रपट महोत्सवाला नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून हे दिसून आले आहे.
अशा महोत्सवांमुळे मराठी भाषा संवर्धन करण्यास मोठी मदत मिळणार आहे. यासाठी भविष्यात देखील असे उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे.
– किरण गायकवाड
विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
या महोत्सवाला साधारण ७ हजार २०० प्रेक्षकांनी भेट दिली, चित्रपटाचा दर हा फक्त ५० रुपये असल्यामुळे प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती, प्रेक्षकांना फक्त चित्रपट पाहायचा आहे तो पण मापक दरात त्यांच्या खिश्याला परवडेल असा असावा. ही संधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मदतीने नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकलो याचे समाधान आहे.
-बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष
मराठी चित्रपट असोशिएशन.





















































