भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तात्यांच्या प्राणीकथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मराठी कथेचे शिल्पकार,वन्यजीवन अभ्यासक,चित्रकार कै.व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्राणीकथांचा मागोवा घेणाऱ्या या दृकश्राव्य कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
शनिवार ,दि.५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.’व्यंकटेश माडगूळकर अभिधान’ तर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला गेला.महाराष्ट्र साहित्य परिषद चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
कथा, कादंबरी, नाटक, कथाकथन, चित्रकला या सगळ्यात विलक्षण उंची गाठणारे, रानवनात, जनात विदेशात मनसोक्त भटकंती करणारे थोर साहित्यिक कै.व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘काळ्या तोंडाची’,’वाडीच्या वस्तीत’,’व्याघ्री’ आणि ‘माझं गुणी जनावर’ या चार कथाचे अभिवाचन करण्यात आले. त्यातून कै.व्यंकटेश माडगूळकरांचे अर्थात तात्यांचे ‘प्राणीकथा विश्व ‘ सर्वांसमोर उलगडले !
निर्मिती,संकल्पना आणि निवेदन ज्ञानदा नाईक यांची होती .दिग्दर्शन मोहन माडगूळकर यांचे होते .निर्मिती सहाय्य राज सांडभोर, आर्या नाईक,नवमी नाईक यांचे होते.
सचिन भुसारी,राधिका माडगूळकर,विभा ओक,स्वानंद पटवर्धन,मोहन माडगूळकर आणि शैला मुकुंद यांनी कथावाचन केले.अभिजित इनामदार यांचे पार्श्वसंगीत,प्रसाद कुलकर्णी यांचे प्रोजेक्शन ,मालविका माडगूळकर यांचे ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजना निकेतन नंदुरबारे यांची होती.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २३९ वा कार्यक्रम होता .
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘सर्व माणसे कर्तृत्ववान असलेली अनेक घराणी महाराष्ट्रात आहेत, त्यात माडगूळकर घराणे आहे. तात्या हे अनोखे चित्रण करणारे लेखक होते. प्राणी कथेतून मराठी साहित्यात त्यांनी ठसठशीत नाममुद्रा उमटवली.त्या काळी माणसे आणि प्राण्यांचे नाते कौटुंबिक होते, जोडलेले होते. पशु, पक्षी, प्राणी यांचे स्थान पुढेही समाजात टिकून रहावे. या अभिवाचनातून माडगूळकर यांची चित्रदर्शी कथा जिवंत झाली आहे’.
माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.





















































