पुणे, (ppcnews.in)१६ जून २०२५: मुळशीचे तहसिलदार श्री. रणजित भोसले यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. “दि टाटा पॉवर कंपनी लि.” या कंपनीचे नाव कमी करून “श्री. धोंडू गोपाल ढोरे” यांचे मालकी हक्काचे आदेश देऊन अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज, १६ जून २०२५ रोजी या निलंबनाचे आदेश जारी केले.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्र. २०६४/२००५ मध्ये, न्यायालयाने २० मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशान्वये श्री. रणजित भोसले यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९, १५० व १५५ अन्वये ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पारित केलेले आदेश रद्द केले होते.
या अनियमिततेची चौकशी अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांच्या स्तरावर करण्यात आली. २१ एप्रिल २०२५ रोजी शासनास सादर केलेल्या अहवालात अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ८५ वर्षांपेक्षा अधिक विलंब विचारात न घेता अंतिम निर्णय पारित करण्याची कार्यवाही कायदेशीर नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
श्री. भोसले यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूर केली आहे. यामुळे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीची कारवाई करण्याचे नियोजन आहे.
निलंबन कालावधीत श्री. रणजित भोसले यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे राहील. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, निलंबन काळात त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा कोणताही धंदा वा व्यापार करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व निलंबन निर्वाह भत्ता गमावतील. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ च्या नियम ६८ नुसार त्यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते दिले जातील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश काढण्यात आला आहे.



















































