पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत औद्योगिक तथा इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या क्षेत्राबाहेरील कामगार तसेच कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रवेशासाठी परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी epass.addl2@pcmcindia.gov.in या ईमेल आयडीवर संबंधितांनी अर्ज सादर करावेत असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले आहे. मात्र संबंधित व्यक्ती प्रतिबंधित (कंटेनमेंट झोन ) क्षेत्राबाहेरील असल्याचे आणि त्याचे स्वतःचे अथवा नेमणूक करणाऱ्या आस्थापनांचे वाहन उपलब्ध असल्याचे स्वयं घोषणापत्र (self declaration) या अर्जासोबत देणे आवश्यक असेल.
काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून अशा स्वरूपाची परवानगी महापालिकेच्या वतीने दिली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठा, दुकाने, उद्याने तसेच खाजगी आस्थापना चालू करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आदेश क्रमांक भुजि/२/कावि/३१८/२०२० दिनांक ३१ मे २०२० निर्गमित केले होते. यामध्ये काही जास्तीच्या सवलती देण्यासाठी सुधारित आदेश क्रमांक भुजि/२/कावि/३२९/२०२० दिनांक ९ जून २०२० हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील उद्याने नागरिकांसाठी सकाळी ५ ते ८ या वेळेत तर दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू करण्यात आली आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेता दहा वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेश देता येणार नाही.





















































