‘पेशव्यांच्या पराक्रमाला व्याख्यानातून उजाळा
ब्राहमण महासंघ आयोजित व्याख्यानाला प्रतिसाद
पुणे :(ppcnews.in)
ब्राह्मण महासंघाच्या वतीने ‘पेशवा का नकोत?’ या विषयावर व्याख्याते सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान ११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानात बोलताना ‘बाजीराव पेशवा यांचे नाव पुणे विमानतळाला द्यावे’ अशी मागणी सुशील कुलकर्णी यांनी केली तर बाजीराव पेशवा यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार सुरु करावा, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.
या कार्यक्रमात सचिन बोधनी,अभय ओरपे, गिरीश गुर्जर यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघ मधे नुकताच प्रवेश केला होता त्यांना पदांची जबाबदारी या कार्यक्रमात देण्यात आली.मनोज तारे यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी नितीन शुक्ल यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक विविध क्षेत्रातील तज्ञ यांची ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली

यावेळी बोलताना सुशील कुलकर्णी यांनी अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्याच्या विस्तारातील ऐतिहासिक घटनांचा सखोल आढावा घेतला. विशेषत: पेशव्यांच्या कारकीर्दीतील राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास करत त्यांनी त्या काळातील परिस्थितीचे विश्लेषण मांडले.
कुलकर्णी म्हणाले,’बाजीरावांची,पेशव्यांची बाजू मांडताना,जातीचा उल्लेख महत्वाचा नाही.कर्तृत्वाचा उल्लेख महत्वाचा आहे.पानिपतच्या लढाईनंतर मराठी राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही.लढाया जिंकण्याबरोबर धर्मासाठी,धर्मरक्षणासाठी,धर्मस्थळांसाठी पेशव्यांनी उत्तम काम केले.फक्त,मस्तानीसाठी पेशव्यांचा उल्लेख करणे योग्य नाही.आता पुढील पिढ्यानी पराक्रमासोबत उद्योजकतेची कास धरली पाहिजे.वैभवशाली इतिहास शिकवला पाहिजे’.
आनंद दवे म्हणाले,’आपल्या संघटित प्रयत्नातून दाता आणि शूर पिढी निर्माण केली पाहिजे.पेशवे,सावरकर,फडके यांचा इतिहास विशिष्ट जातीमुळे दुर्लक्षित केला जाऊ नये.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि तरुणवर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी विषयाची मांडणी आणि सखोल विश्लेषण यांचे कौतुक केले. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की अशा कार्यक्रमांद्वारे इतिहासातील महत्वाच्या पैलूंबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू राहील.





















































