ppcnews.in
नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या प्रचारात नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अपक्ष उमेदवार सागर सुनील परदेशी यांच्या भव्य पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला. रॅलीदरम्यान संपूर्ण प्रभागात ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हाचा गजर घुमत राहिला.
गणपती मंदिर, कृष्णा चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत आबालवृद्धांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही रॅलीत सहभागी होत सागर परदेशी यांना जाहीर पाठिंबा दिला. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, हारतुरे, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांच्या माध्यमातून उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.

रॅलीदरम्यान “शिट्टी चिन्हाला मतदान करा”, “अपक्ष म्हणजे निष्पक्ष विकास” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण नवी सांगवी परिसर निवडणूकमय वातावरणात रंगून गेला होता.
रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून सागर परदेशी भारावून गेले. यावेळी त्यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले, “मिळालेला हा प्रेमाचा आणि विश्वासाचा कौल मी कधीही विसरणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार अधिक बळकट झाला आहे.”
अपक्ष उमेदवार असूनही मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आणि नागरिकांचा उत्साह पाहता, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सागर परदेशी हे एक मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.रॅलीनंतरही संपूर्ण प्रभागात ‘शिट्टी’ चिन्हाची चर्चा सुरू असून, निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असल्याचे दिसून येत आहे.





















































