पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम, जलद आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे हे सत्र पार पडले.
या प्रशिक्षण सत्रात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) प्रदीप जाधव, उप पासपोर्ट अधिकारी श्रुती पांडे तसेच विशेष शाखा व विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्रामध्ये पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा, नवीन प्रणाली आणि उत्तम पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वेळेत व अचूक पोलीस पडताळणी ही पासपोर्ट वितरण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची कडी असून ती राष्ट्रीय सुरक्षेसोबतच नागरिकांच्या सोयीसाठीही आवश्यक आहे.
उप पासपोर्ट अधिकारी श्रुती पांडे यांनी पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) आवृत्ती 2.0 विषयी सविस्तर माहिती देत नवीन डिजिटल सुविधांमुळे पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस यंत्रणेशी समन्वय अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्रादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले. पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यातील समन्वय अधिक बळकट होणार असून नागरिकांना अधिक कार्यक्षम व दर्जेदार सेवा देण्यास मदत होणार आहे.



















































