पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : शहराच्या राजकारणात सध्या नव्या घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व माजी चिटणीस सचिन काळभोर यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन काळभोर यांनी खाजगी कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली असली, तरी या भेटीमागे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सचिन काळभोर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास आमदार महेश लांडगे यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काळभोर यांनी अर्ज दाखल केल्यानंतरही लांडगे यांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काळात सचिन काळभोर हे शिवसेना (उ बा ठा) मध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
सदर भेटीमुळे शहरात राजकीय खळबळ माजली असून, आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.



















































