यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला १६ कोटींचे अनुदान; तक्रारीनंतर कारवाईची मागणी
पिपीसी न्यूज नेटवर्क
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनुदान देण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करत राज्य शासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२१ या कालावधीत महानगरपालिकेच्या स्थायी समितीमार्फत संबंधित समितीला ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर सन २०२२ ते २०२३ या कालावधीत पुन्हा ५ कोटी रुपये, तसेच सन २०२४ ते २०२५ या कालावधीत आणखी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यानंतर अलीकडेच झालेल्या स्थायी समिती बैठकीत आणखी १ कोटी रुपयांचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १६ कोटी रुपयांचे अनुदान या समितीला देण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संबंधित यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही निगडी प्राधिकरण परिसरातील राजकीय संलग्न संस्था असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेकडून सेवा भावी संस्था, मंडळे व संघटनांना साधारणतः ३ लाख रुपयांपर्यंतच अनुदान देण्याचा अधिकार असताना, इतक्या मोठ्या रकमेचे अनुदान देण्यात आल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
सदर प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाच्या आर्थिक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















































