अजय जाधव
पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी
१८ वर्षांखालील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभर राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान–१४” मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक २० जानेवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण १२१ बालकांचा (२७ मुले व ९४ मुली) यशस्वीपणे शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही विशेष मोहीम महाराष्ट्र पोलीस दलामार्फत राबविण्यात आली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व संबंधित विभागांना विशेष सूचना दिल्या होत्या.
सन २०१८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दाखल असलेल्या हरवलेल्या बालकांच्या प्रकरणांचा सखोल आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये २९८ बालक हरवलेले असल्याची नोंद होती. “ऑपरेशन मुस्कान–१४” दरम्यान तसेच यापूर्वीच्या तपासातून मिळून एकूण १२१ बालकांचा शोध यशस्वीरीत्या घेण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त सारंग आवड व प्रादेशिक उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे काम केले.
हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबात परत देणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, अशा मोहिमांमुळे समाजात सुरक्षिततेचा विश्वास दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


















































