उमेदवार रविराज काळेंच्या विकासात्मक दृष्टीकोनाला पाठिंबा
पिपीसी न्यूज नेटवर्क
पिंपरी: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ वाकड – विशालनगर – पिंपळे निलखमध्ये आम आदमी पार्टीच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार रविराज काळे यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी समस्या आणि विकासकामांबाबत समोर ठेवलेल्या दृष्टीकोनाला नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उमेदवार रविराज काळे यांनी दाखवलेली स्पष्ट भूमिका आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव नागरिकांना भावत आहे. “काम बोलतं आहे” या भूमिकेमुळे प्रभागातील नागरिक उमेदवाराला स्वयंस्फूर्त पाठिंबा देत आहेत. घराघरात जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची कार्यपद्धती, तसेच पारदर्शक व प्रामाणिक राजकारणाचा संदेश आम आदमी पार्टीच्या प्रचारातून दिला जात आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये बदल आणि परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता, यावेळी प्रभाग क्रमांक २६ मध्ये विकास, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या राजकारणाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




















































