पुणे : पुणे शहरातील मंडई परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेल प्यासावर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून त्यामध्ये चालणाऱ्या अवैध मद्य विक्री आणि हुक्का पार्लर चालविण्याबद्दल कारवाई केली आहे. शहरातील मंडई परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेल प्यासा वरील कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन खडक पोलिसांनी प्यासा हॉटेलचे मॅनेजर मनोज शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी गुंड, संघटित टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु केली आहेत. त्यातूनच हा छापा टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस उपायुक्त प्रिंयका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता हॉटेल प्यासावर छापा टाकला. त्यात हॉटेलचा मॅनेजर मनोज शेट्टी याने अवैधपणे हुक्का पार्लर चालवून व बार व्यतिरिक्त रोडलगत मद्य विक्रीकरीता वेगळे काऊंटर बनवून तेथे विनापरवाना अनधिकृतपणे मद्यविक्री करीत असताना आढळले. पोलिसांनी या हॉटेलमधून १ लाख १० हजार ६३० रुपयांचे विदेशी मद्य, रोख ६ हजार ७२० रुपये व १९१० रुपयांची हुक्क्याची साधने असा १ लाख १९ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे.